‘भटाळा’ येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन शिवमंदिर

1 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 57 Second

 

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून १८ किमी अंतरावर भटाळा हे नितांत सुंदर गाव आहे. गावाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख असे विशालकाय शिवमंदिर आहे. यास ‘भोंडा महादेव’ म्हणूनही ओळखले जाते. पिवळसर वालुका पाषाणात बांधलेले हे मंदिर जिल्ह्यातील अतिप्राचीन मंदिरापैकी एक आहे.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना असलेले हे भव्य मंदिर राष्ट्र्कुटकालीन मंदिर असून साधारणतः ९ व्या – १० व्या शतकात बांधलेले असावे. पूर्व-पश्चिम १६ मीटर आणि उत्तर दक्षिण ११ मीटर पसरलेले हे मंदिर गर्भगृह आणि अंतराळ या द्विअंगातील बांधणीचे मंदिर आहे. या मंदिराची प्रमाणे, विशेषतः उंचीच्या संदर्भातील प्रमाणे असामान्य मोठी आहेत. मंदिराची अगोदरच असलेली असामान्य उंची अंतराळावर आणि गर्भगृहावर आणखी एक मजला बांधल्यामुळे विशेषत्वाने डोळ्यात भरते. या वरच्या मजल्यांचा पूजाविधीच्या दृष्टीने काहीही उपयोग नसल्यामुळे वरच्या मजल्यांची योजना केवळ स्थापत्याच्या दृष्टिकोनातूनच करण्यात आली आहे असे म्हणता येते. गर्भगृहाच्या तलविन्यास पंचरथ असून, गर्भगृहाच्या बाह्यांगावरील देवकोष्ठांमध्ये दक्षिणेस कार्तिकेय, पश्चिमेस वृषांतिक शिव आणि उत्तरेस चामुंडेची प्रतिमा स्थापित केलेली आहे.

या मंदिराचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय म्हणजे गर्भगृहामध्ये चार चौरस स्तंभावर उभा असलेला मंडप. त्यावर प्रत्येक स्तरावरील चार तुळया एकमेकांना छेदतील अशा प्रकारचे छत आहे. स्तंभाच्या मध्यभागावर राष्ट्रकूटकालीन कलश व गवाक्षाची रूपके कोरलेली आहेत. मंदिराचे द्वार पंचशाख पद्धतीचे असून मध्ये स्तंभशाखा आहे. उत्तरांगावर पाच शिखरे नागर प्रकारची तर एक सोडून एक असलेली उरलेली दोन शिखरे द्राविड पद्धतीची आहेत. दुर्दैवाने मंदिराचे शिखर अस्तित्वात नसल्याने यास भेट देणाऱ्या बहुतांश लोकांना हे शिखरविरहित चौकोनी मंदिर वाटते. ६ x ६ मीटर आकाराच्या गर्भगृहात मध्यस्थानी चार स्तंभाच्या मध्ये १.९ मीटर व्यासाची काळ्यापाषाणाची पिंड असून त्यावर पाषाणातील १.१ मीटर उंचीचे विशाल शिवलिंग आहे. जिल्ह्यात इतके भव्य शिवलिंग इतरत्र कुठेही आढळत नाही.

ग्वाल्हेर मधील ‘तेली का मंदिर’ आणि भटाळयाचे शिवमंदिर यांत बरेचसे साध्यर्म आढळते. ‘तेली का मंदिर’ चे शिखर पाहिल्यास भटाळयाच्या शिवमंदिरास शिखर असताना ते कसे दिसत असेल याची पुरेपूर कल्पना येते.

(लेखन व संपादन – अमित भगत, मुंबई )

साभार – अपुर्वाई पुर्व विदर्भाची फेसबुक पेज

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
50 %
Sleppy
Sleppy
50 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *