कवी मुकुंदराजाच्या ‘विवेकसिंधू’ चे निर्मीतीस्थळ : नागपूर जिल्ह्यातील नयनरम्य ‘आंभोरा’

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 39 Second

 

‘वैन्यगंगेचिया तीरी । मनोहर अंबानगरी ll’ ह्या कवी मुकुंदराज यांच्या १४ व्या शतकातील ‘विवेकसिंधू’ ग्रंथातील उल्लेखावरून ‘अंबानगरी’ म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नसून नागपूर जिल्ह्यातील आंभोरा आहे, या मतास अधिक पुष्टी मिळते.

आंभोरा हे ठिकाण नागपूरपासून साधारपणे ८० किलोमीटर व भंडाऱ्यावरून १८ किलोमीटर अंतरावर आहे. वैनगंगा, आंबा, कन्हान, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर हे ठिकाण वसलेले आहे. कवी मुकुंदराज यांनी वर्णिलेली वैनगंगेच्या तीरावरील हीच ती मनोहर अंबानगरी होय. ‘अंभ’ म्हणजे पाणी, आणि पाण्याने वेढलेल्या या नगराचे नाव अंभपूर-अंभउर-अंभोर-आंभोर-आंभोरा या स्वरूपात बदलत गेले. प्राचीन काळातील समृद्ध नगरीचे पुरावे आंभोऱ्यात जागोजागी आढळून येतात.

विदर्भात नाथ संप्रदायाचा प्रसार करण्याचे श्रेय हरिनाथांना दिले जाते. याच हरिनाथांनी या ठिकाणी बारा वर्षाचे घोर अनुष्ठान केल्याचे म्हटले जाते. या अनुष्ठानाच्या शेवटी यज्ञातून स्वयंभू शिवलिंग उत्पन्न होऊन चैतन्येश्वर या नावाने ते ओळखले जाऊ लागले अशी आख्यायिका आहे. या चैतन्येश्वराजवळ उभे राहिले असता नजरेत भरतो तो कोलेसूर पहाडीचा महालिंगाकृती आकाराचा सुळका. एका बाजूला ‘आम’ तर दुसऱ्या बाजूला ‘कोलारी’ या नद्यांनी पहाडाला अर्धचंद्राकार कोरून पहाडाचा लिंगाकृती आकार तयार केला आहे, यालाच निसर्गनिर्मित कोलारेश्वर म्हणतात. पुरातन अंबानगरीची साक्ष देणारी पाच गावे म्हणजेच अंभोरा देवस्थान, गडपायली, मेंढा, रिठा आणि लहान आंभोरा ही होत. बरेच लोक यांना आजही एकत्रितपणे ‘आंभोरा’ असेच संबोधतात.

हरिनाथांचे शिष्य असलेल्या रघुनाथांचे कवी मुकुंदराज हे पट्टशिष्य होते. हरिनाथ हेच महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी असल्याचे म्हटले जाते. मध्य प्रदेशातील बेतुल जवळील खेरला येथील जैतपाल या गोंड राजाच्या कारकिर्दीत कवी मुकुंदराजांनी ‘विवेकसिंधू’ या मराठी ग्रंथाची निर्मिती करून आदि शंकराचार्यांचे वेदांतातील अद्वैत तत्वज्ञान मराठीत आणले. मराठी भाषेविषयी त्यांचे आत्यंतिक प्रेम या ग्रंथातून ठायी ठायी व्यक्त होते. उपनिषदांचा अर्थ मराठीतून मांडावा यासाठीच माझा लेखनप्रपंच आहे असे ते म्हणतात.

देशी हो का मऱ्हाटी l
परि उपनिषदांचीच रहाटी l
तरी हा अर्थु जीवाचिया गांठी l
का न बांधावा ll

निसर्ग समृद्धीने नटलेल्या नागपूर जिल्ह्यातील सातपुड्याच्या गर्द हिरव्या वनराईत पसरलेला आंभोराचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अश्या या शांत व रमणीय ऐतिहासीक तीर्थस्थळी महाशिवरात्रीला प्रचंड मोठी यात्रा भरते. चैतन्येश्वराच्या या यात्रेला केवळ विदर्भातूनच नव्हे तर छत्तीसगड व मध्यप्रदेश या नजीकच्या राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

(संकल्पना – श्री. चंद्रकांत भुते, लेखन – अमित भगत)

साभार – अपुर्वाई पुर्व विदर्भाची फेसबुक पेज

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *