स्टीफन हिस्लॉप ; मध्यभारताचा आद्य ज्ञान उपासक

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:6 Minute, 52 Second

स्टीफन हिस्लॉप (१८१७-१८६३) – मध्यभारताचा आद्य ज्ञानउपासक

आजच्याच दिवशी १५७ वर्षांपूर्वी म्हणजेच ४ सप्टेंबर १८६३ रोजी हिस्लॉपचा नागपूरजवळील बोरी येथील पावसाळी नाल्यात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.

स्टीफन हिस्लॉपचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, जीवाश्मशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, पर्यावरणशास्त्र यांसारख्या बहुविध क्षेत्रात हिस्लॉपचा मुक्त वावर होता. मध्यप्रांताच्या म्हणजे आजच्या पूर्व विदर्भ, वऱ्हाड, बालाघाट, जबलपूर, छिंदवाडा, बस्तर या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळवून देण्यात हिस्लॉपचा सिंहाचा वाटा होता. मूळचा स्कॉटिश असलेला हिस्लॉप वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर प्रांतात मिशनरी म्हणून आला, व आयुष्याच्या
अखेरीपर्यंत त्याने पूर्णपणे स्वतःला मध्य प्रांताच्या उत्कर्षासाठी वाहून घेतले.

२ मे १८४६ रोजी नागपूर शहरात शुक्रवारी येथे त्याने पहिली शाळा सुरु केली. पुढे १८४९ ला मुलींची पहिली शाळा सुद्धा सुरु केली. त्यानंतर नागपूर, सीताबर्डी, काम्प्टी येथे अजून बऱ्याच शाळा सुरु केल्या गेल्या. स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार त्याने आयुष्यभर अगदी व्रतस्थपणे केला. त्याने सुरु केलेल्या महाविद्यालयाचे रूपांतरण पुढे नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये झाले. स्वतः मराठी भाषेवर विशेष प्रभुत्व मिळवून त्याने शिक्षणात व प्रशासनातसुद्धा मराठी भाषेचा वापर व्हावा म्हणून पुढाकार घेतला. १८५४ च्या वुड्सच्या खलित्यानूसार नागपूर प्रांतात मराठी भाषेला डावलल्यानंतर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्याने मोहीम उघडली व त्याची परिणीती व्हाईसरॉय कॕनिंगद्वारा भ्रष्ट सरकार रद्दबादल करण्यात होऊन मराठी भाषेला प्रशासनाची भाषा म्हणून पूर्ववत स्थान मिळवून देण्यात झाली.

गोंडवनाचा प्रदेश हा घनदाट जंगलाचा व आदिवासीबहुल प्रदेश म्हणून दुर्लक्षित केले गेला होता. त्याच गोंडवनाचा एकेक भाग पायी पालथा घालत हिस्लॉपने या प्रांताचे अंगभूत नैसर्गिक सौन्दर्य जगासमोर उलगडवून दाखवले. आदिवासी गोंड जमातीत फिरून त्याने त्यांची बोलीभाषा, प्रथा, परंपरा, लोककथा यांचे अभ्यासपूर्ण संकलन केले. वर्धा-वैनगंगा-प्राणहिता खो-यात त्याने दगडी कोळश्याचे व लोहखनिजांचे साठे शोधून या भूभागास ‘खनिजांचा प्रदेश’ म्हणून ओळख मिळवून दिली. या भूप्रदेशाची भूरचना, भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा त्याने केलेला सखोल अभ्यास पुढे २२ जिल्ह्यांच्या गॅझेटियर्सचा मुलभूत आधार बनला. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदी खोऱ्यातील परिसरात १८५९ साली त्याने डायनासॉरचे बरेच जीवाष्म आढळून आले. त्यामूळे महाराष्ट्रात सर्वप्रथम डायनासॉरचा शोध घेण्याचा बहुमान हिस्लॉपला प्राप्त होतो. त्यास पुढे ‘टायटॕनासोर इंडिकस’ असे नाव देण्यात आले असून सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी या शाकाहारी डायनासॉरचा वावर या भागात होता हे सिद्ध झाले.

हिस्लॉपने गॅस्ट्रोपॉड वर्गाच्या २२ नव्या प्रजाती, ३ नव्या उपप्रजाती, आणि शिंपलेवर्गाच्या चार नवीन प्रजातींचा शोध लावला. या प्रजातींच्या वर्णनावर आधारित त्याचे अभ्यासपूर्ण शोधनिबंध मुंबई, कलकत्ता येथील एशियाटीक सोसायटी व लंडन येथील जिऑलॉजिकल सोसायटीसमोर सादर केले. त्याने शोधलेल्या हिरव्या रंगाच्या कॅल्साइट खनिजास ‘हिस्लोपाईट’ नाव देण्यात आले. पूर्व विदर्भात जुनापानी, हिंगणा, टाकळघाट यांसारख्या २२ महापाषाणीय शिलावर्तुळांच्या स्थळांचा व ८ शिलाप्रकोष्ठ असलेल्या स्थळांचा शोध हिस्लॉपने सर्वप्रथम लावला. दुर्दैवाने टाकळघाट येथील शिलावर्तुळाचे उत्खनन करून परतत असताना वाटेत आलेल्या पावसाळी नाल्यात त्याचा घोडा गटांगळ्या खाऊ लागला. नाल्याला अचानक आलेल्या पूराचा अंदाज न आल्याने हिस्लॉपला आपला जीव गमवावा लागला. त्या वेळेस सुद्धा त्याच्या अंगावरील शर्टाच्या खिशात उत्खननात मिळालेले पुरावशेष होते, यावरून खऱ्या अर्थाने त्याने ज्ञानरूपी प्रवाहात “स्वतःस वाहून घेतले होते” हे अधोरेखित होते. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत या प्रदेशाच्या उत्कर्षास्तव अहोरात्र झटणा-या हिस्लाॕपच्या स्मृतीप्रीत्यर्थ १८६३ च्या अखेरीस नागपूरात मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापना करुन नागपूरवासीयांनी हिस्लाॕपला ख-या अर्थाने श्रद्धांजली वाहिली.

(लेखन व संपादन – अमित भगत,मुंबई )

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *